Saturday, 18 May 2013

हॉटेलमधील वस्तू चोरण्यात भारतीय तिस-या क्रमांकावर


मेलबर्न – परदेशात अथवा कोठेही दूर फिरायला गेल्यावर तेथील हॉटेलमध्ये राहणा-या पर्यटकांपैकी असे अनेक पर्यटक असतात जे हॉटेलमधील वस्तू अगदी बिनधास्तपणे चोरून नेतात. अशा पर्यटकांमध्ये कोलंबियाचे पर्यटक अव्वल स्थानावर असून भारतीय पर्यटकदेखील पुढे आहेत. हॉटेलमधील छोट्या-मोठ्या वस्तू चोरण्यात भारतीय पर्यटक तिस-या क्रमांकावर असल्याचे एका ग्लोबल सर्व्हेमध्ये सिद्ध झाले आहे.

उचला-उचली करणा-या पर्यटकांपैकी 35 टक्के पर्यटक महागडी आणि वेगळ्या प्रकारची कॉफी तसेच चादरी, नॅपकीन अशा प्रकारच्या वस्तू चोरून नेतात. हॉटेलमध्ये वाचण्यासाठी ठेवलेले मॅगझीन, पुस्तके जास्त प्रमाणात चोरून नेली जातात, असे एका ‘ऑनलाईन अकोमोडेशन बुकिंग सर्व्हिस’ च्या तर्फे घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जानेवारी 2013 मध्ये केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात 28 देशांतील 8600 पर्यटकांचा समावेश करण्यात आला होता. त्यात कोलंबियाचे पर्यटक प्रथम क्रमांकावर असून त्यातील 57 टक्के लोकांनी आपण स्वतः असे प्रकार करत असल्याचे कबूल केले आहे. दुस-या क्रमांकावर मेक्सिकोचे पर्यटक (40 टक्के) असून तिस-या क्रमांकावर भारतीय पर्यटक (38 टक्के) आहेत. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील पर्यटक चौथ्या क्रंमांकावर (34 टक्के) असून 26 टक्के ब्रिटीशदेखील उचला-उचली करण्यात पाचव्या क्रमांकावर आहेत.

डेन्मार्कमधील 65 टक्के लोकांनी आपण हॉटेलमधील वस्तू चोरत नसल्याची कबुली दिली असली तरी डेनिशमधील पर्यटक फार इमानदार असून तेथील 88 टक्के नागरिकांनी कधीही हॉटेलमधून कोणतीही वस्तू न चोरल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment